कोंढवा भागातील सुहासिनी सुजान पार्क सोरेन्टो अपार्टमेंट परिसराला मद्यपी आणि समाजकंटकांचा विळखा; रहिवासी त्रस्त

कोंढवा

पुणे (संपादक सुनिल पाटील) । कोंढवा परिसरामध्ये असलेल्या ‘१५, सुहानी सुजान पार्क सोरेन्टो अपार्टमेंट’ आणि लगतच्या सोसायटी परिसरातील रहिवाशांना गेल्या काही महिन्यांपासून गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात भरदिवसा आणि संध्याकाळच्या सुमारास बाहेरील गैर-नागरिक, काही हुल्लडबाज रिक्षाचालक आणि टवाळखोर राजरोसपणे दारू पिणे, सिगारेट ओढणे आणि अश्लील चाळे करणे यांसारखी गैरकृत्ये करत आहेत. इतकेच नव्हे तर, सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर व परिसरात बाहेरील चारचाकी वाहने अस्ताव्यस्त लावून हे लोक निघून जातात, ज्यामुळे येथील रहिवाशांच्या शांततेला आणि सुरक्षेला मोठा धक्का पोहोचत आहे.

बॅनर लावले तरी समाजकंटकांकडून दादागिरी
या त्रासाला कंटाळून त्रस्त सुजाण नागरिकांनी परिसरात अशा कृत्यांचा निषेध करणारे आणि कडक इशारा देणारे फलक (बॅनर) लावले होते. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन किंवा भरदिवसा देखील हे समाजकंटक ते बॅनर फाडून किंवा काढून फेकून देतात. असे एकापाठोपाठ दोन ते तीन वेळा घडल्याने परिसरात दहशत आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे देखील कठीण झाले आहे.

‘११२’ वर कॉल करूनही पोलिसांची ढिलाई; परिस्थिती ‘जैसे थे’
रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात नियंत्रण कक्षाच्या ‘११२’ या हेल्पलाइन क्रमांकावर अनेकदा तक्रारी नोंदवण्यात आल्या. तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या गंभीर परिस्थितीची सविस्तर कल्पना देण्यात आली. तक्रारीची दखल घेत त्यांनी काही वेळातच पोलीस कॉन्स्टेबलला पाहणीसाठी घटनास्थळी पाठवले. मात्र, पोलिसांनी केवळ थातूरमातूर पाहणी केली आणि ते निघून गेले. पोलीस पाठ फिरवताच हे मद्यपी आणि टवाळखोर पुन्हा सक्रिय होतात, त्यामुळे परिसरातील परिस्थिती ‘जैसे थे’ म्हणजेच अत्यंत बिकट राहिली आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारावर रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून अखेर येथील सुज्ञ नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती ‘राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंच, महाराष्ट्र राज्य’ चे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आणि साप्ताहिक ‘बुलंद पोलिस टाइम्स’ चे उपसंपादक यांना दिली आहे. नागरिकांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आता तीव्र आवाज उठवला जात असून, या संदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.
“कोंढवा पोलिसांनी केवळ नावापुरती गस्त न घालता, या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी किंवा फिक्स पॉईंट द्यावा. तसेच बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्यांवर आणि उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून येथील महिला व नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here