पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | फुगेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी विषारी दारू दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे जाहीर केलेली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. यावेळी आमदार गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून सर्व प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली आहे.
फुगेवाडी येथे घडलेल्या या धक्कादायक विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. या कठीण प्रसंगी शासनाच्या वतीने घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
या दुःखद घटनेला आता काही काळ उलटून गेला असून, बाधित कुटुंबे अजूनही या आर्थिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत. घरातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्यामुळे या सर्व कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यांना या घडीला तातडीने आधाराची आणि आर्थिक मदतीची गरज असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मृत व्यक्तींच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली. यासाठी आवश्यक असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय कागदपत्रे व मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी आणि मदतीची रक्कम लवकरात लवकर पीडितांच्या बँक खात्यावर थेट (Direct Benefit Transfer – DBT) जमा व्हावी, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार अमित गोरखे यांनी घेतलेल्या या तत्पर पाठपुराव्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना लवकरच शासकीय मदत मिळून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







