अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी; ३ गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत ७ आरोपी जेरबंद

अकलूज

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Room) विविध गुन्ह्यांचा तपास करत अत्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने ३ वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला असून एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत चोरीला गेलेली सोन्याची चैन, दागिने आणि रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

३ जून २०२६ रोजी वायफळ (ता. जत, जि. सांगली) येथील एक नागरिक अकलूज येथील हॉटेलमधून जेवण करून एस.टी. स्टँडकडे पायी जात होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी “तुम्हाला एस.टी. स्टँडवर सोडतो” असे सांगून त्यांना गाडीवर बसवले. मात्र, बसस्थानकाकडे न नेता तांबोळीवसाहत (गिरमेवस्ती) येथील निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना काठीने बेदम मारहाण केली आणि खिशातील ९९,३५० रुपयांची रोख रक्कम जबरीने चोरून नेली.

पोलिसांची कारवाई: गुन्हे प्रकटीकरण पथकाने माग काढत ३ आरोपींना ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार सुनील भिमराव भिंगारदिवे (रा. राऊतनगर, अकलूज) याच्या सांगण्यावरून आजिनाथ नागनाथ गिरी आणि संतोष महादेव गायकवाड (दोघे रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीची ९९,३५० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत.

बसस्थानकावरून सोन्याची चैन लांबवणारे अहिल्यानगरचे चोरटे गजाआड

घटना: अकलूज येथील नवीन बसस्थानकावरून टेंभुर्णीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी एका प्रवाशाच्या गळ्यातील ९४,००० रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली होती.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामनगाव देवी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) आणि शुभम गोरक्ष चव्हाण (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. आरोपींकडून चोरीला गेलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन १०० टक्के हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवकुमार मदभावी करत आहेत.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी ओढणारी पंढरपूरची टोळी जेरबंद

माळखांबी (ता. माळशिरस) येथील फिर्यादी आपल्या शेतातून जनावरांसाठी चारा डोक्यावरून घेऊन जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा पत्ता (मणी असलेला) हिसका मारून चोरून नेला होता.

अकलूज पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी बालाजी हनुमान पवार (रा. पवारवस्ती, खेडभोसे, ता. पंढरपूर) आणि पंडित सुभाष होळकर (रा. व्होळे, ता. पंढरपूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सोन्याचा पत्ता आणि गुन्ह्यासाठी वापरलेली ‘बजाज पल्सर’ मोटरसायकल असा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राहुल रणनवरे करत आहेत.

सदरची उत्कृष्ट आणि धडाकेबाज कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज विभाग) संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षिरसागर, राहुल रणनवरे, विशाल पोरे तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय खरात, पंडित गवळे, प्रवीण काळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रवीण मेटकरी व राहुल सोनकर यांचे या तपासात मोलाचे सहकार्य लाभले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here