शिर्डी (प्रतिनिधी, संजय महाजन) | भारतीय सैन्य दलात तब्बल ३० वर्षे अहोरात्र देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले गावचे सुपुत्र माजी सैनिक सतीश रामदास सगर यांच्या सन्मानार्थ नुकताच गावकऱ्यांच्या वतीने एका भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३० वर्षांच्या प्रदीर्घ आणि खडतर सेवेनंतर गावात परतलेल्या सगर यांचे गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले.
सत्कार सोहळ्यात बोलताना सतीश सगर यांनी सीमेवर कर्तव्य बजावताना आलेल्या अनेक कठीण, अंगावर काटा आणणाऱ्या आणि आव्हानात्मक प्रसंगांच्या आठवणींना उजाळा दिला. देशसेवेच्या या प्रदीर्घ प्रवासात आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि खंबीर पाठबळ याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते कमालीचे भावूक झाले. “आज माझे वडील हयात असते, तर माझ्या या कौतुक सोहळ्याचा त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता,” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले.
या सोहळ्यातील अत्यंत हृदयस्पर्शी आणि ऐतिहासिक क्षण तेव्हा ठरला, जेव्हा सतीश सगर यांनी आपल्या सैन्य दलातील अत्यंत मानाची समजली जाणारी ‘कमांडो टोपी’ (सैन्य टोपी) आपली मातोश्री, काका तसेच अर्धांगिनी यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना कडक सॅल्यूट केला. आपल्या मुलाने आणि पतीने देशासाठी दिलेल्या ३० वर्षांच्या योगदानाचा हा आदर पाहून कुटुंबियांसह संपूर्ण सभागृह गहिवरून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या अभूतपूर्व क्षणाचे स्वागत केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सतीश सगर यांच्या शौर्याचा आणि देशसेवेचा गौरव केला. सगर यांच्या देशप्रेमाचा आणि शिस्तीचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेण्याची गरज मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. दरम्यान, “सैन्यातून निवृत्त झालो असलो तरी समाजसेवेतून निवृत्त झालेलो नाही; यापुढेही समाजकार्यात सक्रिय राहून गावातील युवकांना देशसेवेसाठी व सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरित करत राहीन,” असा निर्धार सतीश सगर यांनी बोलून दाखवला.
या कौतुक सोहळ्याप्रसंगी माजी उपसरपंच देविदास जिरे, सरपंच कविता वाघ, रामभाऊ माळी, पत्रकार विशाल रायते, प्रकाश वाघ, दयाराम सगर, साहेबराव जिरे, माजी सैनिक सुधाकर रायते, शबाब खाटीक, गौरव माळी, जयवंत जाधव, मंगेश रायते, नंदू जिरे, शालिक रायते, पंडित कळदंते यांच्यासह अनेक आजी-माजी सैनिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे, आदराचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







