सांगली पोलिसांची धडक कारवाई : मिरजेत गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेले २ तडीपार गुंड जेरबंद; २ धारदार कोयते जप्त

सांगली पोलिसांची

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) केलेले दोन सराईत गुन्हेगार जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश करून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने त्यांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे दोन धारदार लोखंडी कोयते जप्त केले आहेत.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक मिरज परिसरात गस्त घालत होते.

या दरम्यान पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ) सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत आणि प्रकाश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन तडीपार गुंड गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिरजेतील गजानन डेअरीकडे जाणाऱ्या चुनाभट्टी रोडवर संशयास्पदरीत्या फिरत असून, त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने चुनाभट्टी रोड परिसरात तातडीने सापळा रचून निगराणी सुरू केली.

परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांना दोन इसम संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. पोलिसांनी कोणतीही संधी न देता झडप घालून दोघांना जागीच ताब्यात घेतले. त्यांची नावे आणि पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे:  इजाज ऊर्फ एजाज अल्फाज शेख (वय २९ वर्षे, रा. उर्दू शाळेजवळ, अमननगर, मिरज) आणि   मलिकजान ऊर्फ सोहेल राजू नदाफ (वय २६ वर्षे, रा. कॅनॉल रोड, लक्ष्मी मंदिराजवळ, मिरज) अशी असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पोलीस अधीक्षक सांगली यांनी जून २०२५ मध्ये या दोघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार (तडीपार) केले असल्याचा गुन्हा उघड झाला. जिल्ह्यात प्रवेश करण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही वैध आदेश किंवा परवानगी नव्हती.

संशय बळावल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष दोघांची अंगझडती घेतली असता, इजाज शेख आणि मलिकजान नदाफ या दोघांच्या कंबरेला धारदार लोखंडी कोयते मिळून आले. हे दोन्ही कोयते (किंमत अंदाजे १,००० रुपये) जप्त करण्यात आले आहेत. आरोपी एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानेच शस्त्र बाळगून फिरत असल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ) रोहन घस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म ऍक्ट) कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, अनिल ऐनापुरे, सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, हणमंत लोहार, रोहन घस्ते आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here