बार्शी पोलिसांची कारवाई : कोयत्याने दहशत माजवणारा सराईत गावगुंड संजय आरगडे जेरबंद

बार्शी

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | बार्शी शहर आणि तालुका परिसरात सर्वसामान्य नागरिक, गरीब शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मारहाण करून दहशत माजविणाऱ्या एका सराईत गावगुंडाला बार्शी तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. जमिनी बळकावणे, लोकांना धमकावणे आणि चक्क शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत या गुंडाची मजल गेली होती. तो बार्शी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

 

आरोपी संजय आरगडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना त्रास दिल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी तातडीने दखल घेत त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. १७१/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११९, ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोधमोहीम राबवून, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संजय आरगडेला काही तासांतच अटक केली.

अटक करण्यात आलेला आरोपी संजय आरगडे हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जमिनी बळकावणे, गोरगरिबांना मारहाण करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामात हस्तक्षेप करणे अशा विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला तडीपार (हद्दपार) देखील करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

पोलिसांचे जनतेला आवाहन: न घाबरता पुढे या, नाव गोपनीय ठेवणार!

“संजय आरगडे याने जर यापूर्वी इतर कोणाला त्रास दिला असेल किंवा त्याच्याविरुद्ध काही तक्रार असेल, तर नागरिकांनी न घाबरता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. तसेच परिसरात विनापरवाना सावकारकी करणारे, दूध व अन्नात भेसळ करणारे, महिलांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांची माहिती पोलिसांनी द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.”

महेश ए. माने (सहा. पोलीस निरीक्षक, बार्शी तालुका पोलीस ठाणे)

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना त्रास देणारे, दहशत माजविणारे, महिलांची छेडछाड करणारे, बेकायदेशीर सावकारकी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

सदरची धडाकेबाज कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, सह-पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ. मंगरुळे (बक नं. ३७३), पोहेकॉ. बोबडे (बक नं. १५७५), पोहेकॉ. खांडेकर (बक नं. १७५), पोहेकॉ. धनराज केकाण (बक नं. १७४७), पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश दासरे (बक नं. १९९७), पोकॉ. राहुल बोंदर (बक नं. ७४७), पोकॉ. गोविंद बचुटे (बक नं. १०९९), पोकॉ. सुरेश बिरकले (बक नं. १०२७) आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर खराडे (बक नं. २४) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here