पंढरपूर पोलिसांनी’ब्लाईंड मर्डर’चे गूढ ४८ तासांत उकलले; महिलेसह दोघे जेरबंद

पंढरपूर

पंढरपूर (प्रतिनिधी प्रकाश इंगोले) | कोणताही सुगावा नसताना, केवळ अंधाराचा फायदा घेऊन करण्यात आलेल्या एका वृद्धाच्या क्रूर खुनाचा छडा लावण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. हरीपाठ ऐकण्यासाठी गेलेल्या भारत पांडुरंग माने यांच्या डोक्यात व गुप्तांगावर वार करून त्यांचा खून करणाऱ्या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उसने घेतलेले पैसे व इतर कारणांवरून हा भयंकर कट रचून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश धोंडीराम मोठे (वय ४५, रा. नरखेड) आणि महिला आरोपी ललिता दत्तात्रय सोळगे (वय ४३, रा. गणेशवाडी, ता. मंगळवेढा) यांना ५ जून २०२६ रोजी अटक केली आहे. ३१ मे २०२६ रोजी भारत पांडुरंग माने हे कीर्तन व हरिपाठ ऐकण्यासाठी नारायण चिंचोली येथील मंदिरात गेले होते. मात्र, त्यानंतर अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाने त्यांच्या डोक्यात अज्ञात हत्याराने गंभीर वार करून त्यांना जीवे ठार मारले होते. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) प्रमाणे २ जून २०२६ रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी ३ पथके तयार केली. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोहोळपासून ते पेणूर टोल नाका, टेंभुर्णी टोल नाका, तिसगाव टोल नाका तसेच नारायण चिंचोली, तुंगत व रोपळे या गावांमधील शेकडो सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. या फुटेजचे विश्लेषण आणि सीडीआर व एसडीआर या तांत्रिक पद्धतीचा वापर करून संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. तसेच मयताचा कोणाशी शेतीचा किंवा पैशांचा वाद आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली.

तपासामध्ये अत्यंत भयंकर गोष्टी समोर आल्या आहेत. मयत भारत माने हे कीर्तन व हरिपाठाला ज्या ज्या मंदिरात जात असत, त्या मंदिरांची माहिती आरोपी रमेश मोठे याने आधीच काढून ठेवली होती. ३१ मे रोजी ते नारायण चिंचोली येथील मंदिरात जाणार असून, तिथला रस्ता अत्यंत अंधाराचा आणि निर्जन आहे याची खात्री रमेशने केली होती.

प्लॅनिंगनुसार, रमेश मोठे याने ललिता सोळगे हिला आणवली चौक येथून आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि ते दोघेही नारायण चिंचोली येथील मंदिरात आले. हरिपाठ संपताच ललिता सोळगे आणि मयत भारत माने हे एकाच मोटरसायकलवरून रोपळे येथील शेताकडे निघून गेले. रमेश मोठे याने दबा धरून त्यांचा पाठलाग केला. शेतात पोहोचताच रमेश मोठे आणि ललिता सोळगे या दोघांनी मिळून धारदार हत्याराने भारत माने यांच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर जोरदार वार करून त्यांना जागीच ठार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ललिताचा ३१ मे रोजी लोकांमध्ये कुठेही संपर्क येऊ दिला नाही, जेणेकरून संशय येणार नाही.

तपासादरम्यान पोलिसांना संशयित रमेश मोठे हा ३१ मे रोजी ललिता सोळगे हिच्यासोबत दिसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रमेश मोठे याची क्राईम हिस्टरी तपासली असता, यापूर्वी त्याने नरखेड परिसरात एका महिलेचा खून करून तिचे प्रेत शेतात पुरल्याचा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तातडीने सापळा रचून रमेशला ताब्यात घेतले.

सुरवातीला रमेशने “मी ललिताला ओळखत नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवले, तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. ललिताने भारत माने यांच्याकडून उसने घेतलेले पैसे व इतर कारणांवरून ३१ मे रोजी त्यांना रोपळे येथील शेतात नेऊन जिवंत मारल्याची कबुली त्याने दिली.

सदरची धडाकेबाज कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस हवालदार साजन भोसले, दीपक भोसले, सुहास देशमुख, मंगेश रोकडे, स्वप्नील वडदेकर, सहायक फौजदार जनार्दन करे, पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने, इरफान शेख, विजयकुमार आवटी, हसन नदाफ, चालक महेश गोडसे, रामभाऊ चाटे, महिला पोलीस हवालदार सुवर्णा कदम, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव आणि महिला पोलीस अंमलदार ननावरे यांच्या पथकाने केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here