- माजी नगरसेवक श्री अशोक मुकरंदे यांचा प्रशासनावर प्रहार
- शहादा शहरातील घन कचरा पसरलाय भर रस्त्यावर
- नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
शहादा (विजय निकम) – शहादा शहरातील घनकचरा गोळा करून नगरपालिकेकडून त्याची योग्य विल्हेवाट लावली
जाते. शहरापासून ५ कि.मी.अंतरावर शहादा _धुळे महामार्गावर नगरपालिकेचा घन कचरा डेपो आहे.या घनकचरा डेपोतील डम्पिंग ग्राउंड मधून घनकचऱ्यापासून खत निर्मिती करून साफसफाई करणे कामी नगरपालिकेकडून १ कोटी 32 लाख रुपये खर्च केले गेले आहेत. पुण्याच्या एका कंपनीला या डेपोच्या साफसफाईचा ठेका दिला गेला आहे. परंतु या कंपनीकडून कुठलीही साफसफाई झालेली नसून कचरा अक्षरशः रस्त्यावर पसरलेला आहे.यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार माजी नगरसेवक अशोक मुकुंरंदे यांनी केली आहे.
तक्रारीनुसार सदर घनकचरा डेपो साफसफाई करण्याचे काम पुण्याच्या एका कंपनीला दिले आहे. या डेपोच्या साफसफाईसाठी लागणारा खर्च केवळ 70 ते 75 लाख च्या घरात असतांना जळगाव प्राधिकरणाची मंजुरी घेऊन १ कोटी ३२ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला . एवढी रक्कम खर्च करूनही घनकचरा हा रस्त्यावरती पसरलेला असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. ज्या ठेकेदाराला शहरातील कचरा उचलण्याचा ते का दिला आहे ते रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. घनकचरा टाकण्यासाठी डेपोमध्ये रस्ताच नसल्याकारणाने हा कचरा नगरपालिका सफाई कर्मचारी धुळे _शहादा महामार्गालगतच टाकत असल्याचे लक्षात येत आहे. डेपो पलीकडे असलेल्या शेतात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर देखील घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे कुठे आहेत शहादा नगरपालिका मुख्याधिकारी ? असा प्रश्न निर्माण होतो. covid-19 च्या काळात जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब ठेकेदारांची मर्जी सांभाळत असल्याचे समोर आले आहे. कोणतीही चौकशी न करता ठेकेदारांची बिले अदा करण्यात ते व्यस्त आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
कोरोना महामारी पासून नागरिकांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे ,हातामध्ये दंडुका घेऊन नागरिकांना वठणीवर आणणारे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी साहेब आपल्या मूळ कर्तव्यापासून दूर गेल्याचे दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याकडे मात्र त्यांनी कानाडोळा केला असल्याचे लक्षात येत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याकारणाने याकडे गांभीर्याने पाहणे उचित ठरेल. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा आणि या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी अशी विनंती केली आहे.







