कासारवाडीत ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ डिजिटल शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘वारे गुरुजी पॅटर्न’ राबवणार; विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका कटिबद्ध: महापौर

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर, रोहन सोनाळे) | “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तर त्यांची विचारशक्ती अधिक सक्षम होईल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी महापालिका कटिबद्ध असून त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत,” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळा’ या नवीन, सुसज्ज व अत्याधुनिक शाळा इमारतीचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या शुभहस्ते २ जुलै २०२६ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना महापौरांनी महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘वारे गुरुजी पॅटर्न’ महापालिकेच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. तसेच ‘अक्षर विश्व’ ही संकल्पना प्रत्येक शाळेत प्रभावीपणे राबवून महापालिकेच्या शाळा शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कासारवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ही नवी इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत  नवीन पाच मजली इमारतीमध्ये एकूण २४ वर्गखोल्या असून येथे सुमारे ९६० विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत, प्रयोगाधारित शिक्षणासाठी सुसज्ज संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळेसह एकूण ५ लॅब्ज तयार करण्यात आल्या आहेत, नृत्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहांची व्यवस्था आहे, शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी ४ स्वतंत्र कार्यालये उभारण्यात आली आहेत.

उद्घाटनानंतर महापौर रवी लांडगे यांनी संपूर्ण इमारतीची, वर्गखोल्यांची आणि प्रयोगशाळांची पाहणी केली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.

या सोहळ्याला उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, नगरसदस्या मनिषा लांडे, वर्षा जगताप, प्रतीक्षा जवळकर, रिटा सानप, श्रुती वाकडकर, माजी नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रकाश जवळकर, राजेंद्र शेळके, रतन लांडगे, अशोक पगारे, रमेश लांडगे, ॲड. संजय गोडसे, भगवान धावटे, डॉ. महेश शेटे, शरद औटे यांसह अनेक नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य जितेंद्र ननावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नगरसदस्या मनिषा लांडे यांनी मानले.

श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here