पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर, रोहन सोनाळे) | मराठी भाषेचे संवर्धन, उच्च शिक्षणात मराठीला सन्मानाचे स्थान आणि मातृभाषेतून तांत्रिक शिक्षणाचा विस्तार या दृष्टीने महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) या संस्थेने राज्यात सर्वप्रथम मराठी माध्यमातून अभियांत्रिकी (Engineering) पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. राज्याच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या या अभिनव उपक्रमाची विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी विशेष दखल घेत संस्थेचे सभागृहात जाहीर अभिनंदन केले.
विधान परिषदेत मराठी भाषा संवर्धनासंदर्भातील चर्चेदरम्यान बोलताना आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले की, मराठी ही केवळ दैनंदिन व्यवहाराची किंवा संवादाची भाषा न राहता ती ‘ज्ञानभाषा’ म्हणून अधिक सक्षम झाली पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मराठीचा वापर वाढणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांना शासनाने व समाजाने मोठे प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवड हे राज्याचे प्रमुख औद्योगिक, तांत्रिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा शहरातील एका नामांकित संस्थेने मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाची केलेली ही ऐतिहासिक सुरुवात राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक लौकिकात मोठी भर पडल्याचेही त्यांनी सभागृहात अधोरेखित केले.
आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला आणि चर्चेला उत्तर देताना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना. उदय सामंत यांनी शासनाची भूमिका मांडली. मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण मातृभाषेत उपलब्ध व्हावे, यासाठी शासन सर्व आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत करत असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
महाराष्ट्रातील इतर शैक्षणिक संस्थांनीही ‘PCCOE’चा हा आदर्श घेऊन आपल्याकडे मराठीतून व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे नवे मार्ग खुले करावेत, अशी अपेक्षा आमदार अमित गोरखे यांनी शेवटी व्यक्त केली. मराठीला ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आणि तांत्रिक शिक्षणात मातृभाषेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी संस्थेचे पुन्हा एकदा विशेष अभिनंदन केले.







