स्व. धीरजभाऊ परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे एकमुखी मागणी

धीरजभाऊ परदेशी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) : स्व. धीरजभाऊ परदेशी यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून, या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता कठोरात कठोर आणि कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात करणी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहनजी घुगे यांना एकमुखी निवेदन देण्यात आले.

 

या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र दुःख, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत निष्पक्ष व जलदगतीने करण्यात यावा, तसेच या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात स्व. धीरजभाऊ परदेशी यांच्या हत्येचा तपास निष्पक्ष आणि जलदगतीने करण्यात यावा. या खटल्यात सन्माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी. सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सक्षम कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी. पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी. पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कार्याध्यक्ष भगवान खंडाळकर, दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे, संदीप राणा, सारिकाताई पाटील, किरण राजपूत, कविताताई पाटील, जयश्रीताई पाटील, आशिष राजपूत, अजय राजपूत, विकास राजपूत, अभिजित राजपूत, दिलीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here