गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पत्रकार संघटनेच्या कार्याचा गौरव
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या हस्ते आणि राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, दैनिक लोकशाहीच्या संपादिका शांताताई वाणी यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
भूषण महाजन हे गेल्या दशकभरापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यात अत्यंत सक्रिय आहेत. पत्रकारांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने, उपक्रम राबविण्यासोबतच संघटनेच्या विस्तारात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच संघटनेचे कार्य जिल्ह्याच्या दूरवरच्या भागांत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर पुन्हा एकदा जळगाव जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करून संघटनेचे कार्य आणखी व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भूषण महाजन यांच्या या पुनर्नियुक्तीबद्दल पत्रकारिता, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. विविध मान्यवर, पत्रकार बांधव आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस व यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.







