मंदिर महाद्वार परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचे कौतुक
शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | मंदिर महाद्वार येथे कार्यरत सुरक्षा कर्मचारी श्री. अण्णासाहेब गजानन रानवडे यांनी प्रामाणिकता व कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. आज मंदिर परिसरातील सोळा गुंठे परिसरात त्यांना एक पर्स आढळून आली. त्यांनी विलंब न करता सदर पर्स संरक्षण कार्यालयात जमा केली.
सदर पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम ₹५,२००/- असल्याचे आढळून आले. पर्सच्या मालकाचा शोध घेण्यासाठी चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सदर पर्स व रोख रक्कम ही पुणे येथील साईभक्त महिला श्रीमती पूजा राजेश मडवळेकर यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आवश्यक खातरजमा करून पर्स व त्यातील संपूर्ण रोख रक्कम संबंधित साईभक्त महिलेस सुरक्षितपणे ताब्यात देण्यात आली.
सुरक्षा कर्मचारी अण्णासाहेब रानवडे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे कौतुक होत असून, साई संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेतील अशा कर्मचाऱ्यांमुळे भाविकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.प्रामाणिकपणा जपणाऱ्या अण्णासाहेब रानवडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रोहिदासजी माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.







