सातारा पोलिसांनी केला अल्पवयीन मुलीची छेड काढणारा तसेच भर रस्त्यात लैंगिक चाळे करणारा इसम जेरबंद

सातारा

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) । शहरातील पवई नाका परिसरात असणाऱ्या खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस जवळ बोलावून तिच्यासमोर लैंगिक चाळे करणाऱ्या अनोळखी इसमाबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाल्याने सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी तातडीने डी बी पथकास सदर इसमाचा शोध घेण्याचा आदेश दिला होता.

 

सदर इसमाचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे  शोध घेत असताना सदर इसमाने  सदर घटनेनंतर दोन ते तीन विविध ठिकाणी महिलांसमक्ष लैंगिक चाळे केल्याचे तसेच छेड काढल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले होते.

याबाबत मा.पोलीस अधिक्षक श्री.निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील यांना माहिती देण्यात आली असता वरिष्ठांनी सदर इसम आणखी घृणास्पद कृत्ये करण्यापूर्वीच त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.  त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सातारा शहर डी.बी. पथकाची टीम शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयित  इसमाच्या मोटरसायकलच्या अर्धवट दिसणाऱ्या नंबर प्लेटवरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून माहिती प्राप्त करून सदर इसमाचा शोध घेत होते.

सदर प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्याने तसेच सदर इसमांकडून महिला व मुलींच्या छेडछाडीचे आणखी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यास तातडीने ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यामुळे  सीसीटीव्ही फुटेज आधारे प्राप्त करण्यात आलेले आरोपीचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रसारित करण्यात आले होते.

सातारा शहर डी बी पथकाकडून सुमारे 60 सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत व त्याप्रमाणे माग काढत जात असताना सदर संशयित इसम हा सैदापूर या गावापर्यंत पोहोचल्याचे दिसून आल्याने डीबी पथकाने गावातून अधिक माहिती घेतली असता सदर इसमाचे नाव विनोद मोहन कामटे. वय 40 वर्ष, रा. सैदापूर जि. सातारा मूळ गाव जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर हा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास तातडीने ताब्यात घेण्यात आले.

सदर प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 664 /2026 भारतीय न्याय संहिता  कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो श्री.निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, वैभव माने, संतोष घाडगे, सचिन रिटे यांनी केलेली आहे.

याप्रसंगी मुलींनी न घाबरता त्यांच्यासोबत एखादी अनुचित घटना घडल्यास किंवा कोणी पाठलाग करीत असल्यास  याबाबत न घाबरता पालकांना तसेच शिक्षकांना माहिती दिली पाहिजे. पालकांनीही मुलींच्या अशा तक्रारीवर तात्काळ लक्ष देऊन न घाबरता पोलिसांची मदत घेतली पाहिजे, जेणेकरून अशा विकृत वृत्तींना वेळीच पायबंध घालने शक्य होईल, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here