सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | गणेशवाडी (वडूज ) येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले वॉटर एटीएम गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
गावातील नागरिकांना कमी खर्चात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत ही नादुरुस्त असल्याने या सुविधेचा कोणताही लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. वॉटर एटीएम नादुरुस्त होऊन बराच कालावधी लोटला असतानाही त्याची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढलेली असली तरी पिण्यासाठी शुद्ध व सुरक्षित पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे. वॉटर एटीएम बंद असल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दूरवरून पाणी आणणाऱ्या कुटुंबांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने नागरिकांच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहून नादुरुस्त वॉटर एटीएमची तातडीने दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने वॉटर एटीएमची दुरुस्ती करण्याबरोबरच त्याची नियमित देखभाल व तांत्रिक तपासणी करण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या पाणीपुरवठा सुविधेचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल, तर त्यामागील कारणे स्पष्ट करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.







