जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | जिल्ह्यातील पाचोरा शहरात चोरी व मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाचोरा पोलिसांचे गुन्हे शोध पथक सोमवारी, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून शहरात गस्त घालत होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला पाचोऱ्यातून अटक करण्यात आली.
किन्हवली पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे ग्रामीण येथे गुन्हा रजि. क्र. ३३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९ (१), ६१ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रितम नवनीत पाटील (वय २५), रा. फ्लॅट क्रमांक २०, अवध अॅनेक्स, समर्थ नगर, पाथर्डी फाटा, नाशिक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सदर आरोपी पाचोरा शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलीस पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.मिळालेल्या माहिती नुसार आरोपीच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे त्याचे लोकेशन पाचोरा येथील भाजी मंडई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी भाजी मंडईत जाऊन शोध घेतला असता एक संशयित इसम भाजीपाला खरेदी करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रितम नवनीत पाटील असल्याचे सांगितले.सदर आरोपीला पाचोरा पोलीस ठाण्यात आणून त्याबाबत किन्हवली पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्याचे पथक पाचोरा येथे दाखल झाले असून, प्रितम पाटील याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी किन्हवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.कारवाईत पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ गजानन देशमुख, पो.कॉ. शरद मांगो पाटील आणि पो.कॉ. श्रीराम अनिल शिंपी यांचा सहभाग होता.







