सौ. सोनिया जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आणि
ना. जयकुमार गोरे यांच्या आयोजनातून भव्य सोहळा
सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | सौ. सोनिया जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या आयोजनातून वडूज, ता. खटाव येथे पहिल्यांदाच सर्वात मोठा दहीहंडी उत्सव सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.
वडूज येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा भव्य दहीहंडी उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. भक्ती, पारंपरिक संस्कृती, मनोरंजन आणि तरुणाईच्या उत्साहाने संपूर्ण वडूज शहर आणि परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. एसटी स्टँड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला नागरिक, युवक तसेच माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वडूजकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या दहीहंडी उत्सवामध्ये अनेक गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गोविंदा पथकांनी मानवी मनोऱ्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीने प्रयत्न केले. या थरारक क्षणांना उपस्थित नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत गोविंदांचा उत्साह वाढवला. तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत १ लाख १०० रुपयांचे पारितोषिक पटकावले. मानवी मनोऱ्यांचे आकर्षक प्रदर्शन आणि गोपाळकाल्याच्या उत्साहात संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.
या दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये आनंदाचे रंग भरण्यासाठी विविध दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, दहीहंडीची समृद्ध परंपरा आणि तरुणाईचा उत्साह यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात पाहायला मिळाला.
भक्तिमय वातावरणासोबतच संगीत, नृत्य आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमस्थळी उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील रशियन कलाकार इरीना रुडाकोवा, कोमल शेटे तसेच सेलिब्रिटी डान्सर्स जुई तानपुरे, संजना काळे, श्रावणी महाजन, चेतन लोखंडे आणि प्रणव रावराणे यांच्या दमदार सादरीकरणाचे. तसेच बिग बॉस फेम कोरिओग्राफर चेतन नानू आणि ‘सारेगमप’ फेम संगीतकार अमोल पाळेकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. कलाकारांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. टाळ्यांचा कडकडाट, संगीताचा ठेका आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वडूज शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तरुणाईसह महिला आणि नागरिकांनी या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.
यावेळी वडूजकरांना भक्ती, परंपरा, मनोरंजन आणि तरुणाईच्या ऊर्जेचा अनोखा अनुभव घेता आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा धार्मिक उत्साह आणि दहीहंडीच्या पारंपरिक संस्कृतीसोबतच आधुनिक मनोरंजनाची जोड या उत्सवाला लाभली. भव्य आयोजन, गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग, सेलिब्रिटी कलाकारांची उपस्थिती आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद यामुळे वडूजमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा भव्य दहीहंडी उत्सव वडूजच्या सांस्कृतिक वातावरणातील विशेष आकर्षण ठरला.








