जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने जामनेर तालुक्यात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत जामनेर, पहूर व फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १८९ रेकॉर्डवरील आरोपींची झाडाझडती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५२ मोटारसायकली व एका रिक्षासह एकूण ५३ संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच एका पाहिजे असलेल्या गुन्हेगाराला शोधून काढण्यासह एका आरोपीस हद्दपारीची नोटीस आणि पाच जणांवर अजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावण्यात आले. पोलीस ठाणेनिहाय कारवाईत जामनेर हद्दीत ७२ गुन्हेगार तपासून दारूबंदीच्या ६ कारवायांतून १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल व ११ वाहने जप्त करण्यात आली.
पहूर हद्दीत ६४ गुन्हेगारांची तपासणी करत दारूबंदीच्या १० कारवायांत २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल व २० दुचाकी जप्त केल्या, तसेच ४ वॉरंट बजावले. फत्तेपूर हद्दीत ५३ संशयितांची तपासणी करून दारूबंदीच्या ३ कारवायांतून १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल, २२ दुचाकी जप्त करत १ वॉरंट बजावण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सर्व वाहनांची आरटीओ कार्यालयामार्फत पडताळणी सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि स्वप्नील शिंदे, निवृत्ती बोऱ्हाडे, अंकुश जाधव, प्रवीण दातरे यांच्यासह १७ पोलीस अधिकारी, १५० अंमलदार आणि आरसीपीच्या ४ पथकांनी केली. सण-उत्सवाच्या काळात शांतता राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







