माझ्या बाप्पाचे विसर्जन नाही, बाप्पाची माती निसर्गासाठी; संत ज्ञानेश्वर विद्यालयात जलसंधारणाचा अनोखा संदेश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) |गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ भक्तीचा उत्सव न साजरा करता त्यातून जलसंधारण, जलस्रोत संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा ठोस कृतीशील संदेश देणारा अभिनव उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने शाडूच्या मातीचा पुनर्वापर करत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

‘माझ्या बाप्पाचे विसर्जन नाही, माझ्या बाप्पाची माती!’ या संकल्पनेतून शाळेतील शाडूच्या मातीच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कोणत्याही नदी, तलाव किंवा नैसर्गिक जलस्रोतात न करता शाळेच्या परिसरातच एका मोठ्या जलपात्रात करण्यात आले. यामुळे स्थानिक जलस्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत झाली. विसर्जनानंतर विरघळलेल्या मातीचा गाळ सुकवून त्याचा वापर शाळेच्या हरित परिसर निर्मिती, वृक्षारोपण आणि परसबागेतील झाडांसाठी खत व माती म्हणून केला जाणार आहे.
केवळ मूर्तीच नव्हे, तर उत्सवादरम्यान जमा झालेल्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करण्यात आले. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते शाळेतील वनस्पतींना देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. “जलस्रोत वाचवा, पाणी जपा आणि बाप्पाची माती निसर्गाला अर्पण करा” या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
हा अभिनव उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका शितल कोळी, शाळेच्या ‘इको क्लब’चे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बाप्पाच्या विसर्जनाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here