सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून लावून ठेवलेला ३ लाख ७५ हजार रुपयांचा ट्रॅक्टर व मोगडा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना करमाळा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या आधारे अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३, रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या मालकीचे मौजे वीट हद्दीतील शेत गट नं. ८१३ मधील पात्राचे शेडमध्ये सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (एम.एच. ४५ एफ ८०१९) व ट्रॅक्टरला जोडलेला पाळीचा मोगडा असा एकूण ३,७५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ते दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दरम्यान अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला. यादरम्यान दिपक रामदास बरडे (वय ३२, रा. चिखलठाण नं. ०१, ता. करमाळा, जि. सोलापूर, मूळ रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड). आकाश रामदास बरडे (वय २६, रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड). हे आरोपी निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ट्रॅक्टर व मोगडा असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जाधव करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजना कृष्णा व्ही.एस., पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, सपोउनि हनुमंत जाधव व पोलीस पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.







