जळगाव (संपादक सुनील पाटील) – कोरोनाच्या साथीमुळे प्रत्येक माणूस स्वतःची काळजी घेण्यात अडकला आहे. मात्र लोकांच्या मदतीला धावून जाणारा खाकी वर्दीतला माणूस आणि देव या काळात अनेकदा नागरिकांना अनुभवयाला मिळाला आहे. आजही (दि.१८) जळगावकर नागरिकांनी खाकी वर्दीतील माणुसकी अनुभवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन बसस्थानकासमोर असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर दुपारी सुमारे १२.३० च्या सुमारास एक अनोळखी महिला अत्यवस्थ अवस्थेत पडलेली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलिस नंदा पानपाटील व अश्विनी सावकारे यांनी या महिलेच्या जवळ जाऊन तिची चौकशी केली. त्यावेळी ही महिला मला अधिकाऱ्यांना भेटायवयाचे आहे. असेच सांगत होती. या महिला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, थोड्याच वेळापूर्वी मी फिनाईल पिऊन आल्याचे तिने सांगितले.
घटनेचे गांभीर्य ओळखत या महिला पोलिसांनी तात्काळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करुन सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अवघ्या पाचच मिनीटात जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल व त्यांच्यासोबत जुबेर तडवी, अविनाश देवरे, विनोद पाटील, मनिषा जाधव, संगीता इंगळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.
महिलेची परिस्थिती अधिकच अत्यवस्थ होत असल्याने, तिला तातडीने जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या गाडीतच घेऊन, जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आज अनोळखी महिलेला खाकीतील माणुसकीने मदत केल्याने, तिचा जीव वाचण्यास मदत होईल. तातडीने या महिलेची दखल घेऊन तिला तात्काळ वैद्यकिय उपचार मिळवून दिल्याबद्दल जळगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






