धरणगाव शहर शिवसेनेच्या नूतन कार्यकारिणीस नियुक्तिपत्रे प्रदान;
प्रत्येक प्रभागात जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि पुढेही राहील. नगरपालिकेत जनतेने आपले १५ नगरसेवक निवडून दिले असून, नगराध्यक्षपद थोड्याशा मतांनी हुकले म्हणून खचून न जाता पराभवातून शिकून पुन्हा नव्या ताकदीने उभे राहावे. संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद असून, मजबूत संघटनेच्या बळावरच सत्ता मिळते. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे रोखठोक प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहर शिवसेनेच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, पदे मिरवण्यासाठी नसून ती जनतेची कामे करण्यासाठी आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांनुसार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम करा. प्रत्येक नगरसेवक व पदाधिकाऱ्याने प्रभागातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहून अनुभवी शिवसैनिकांचे मार्गदर्शन घ्यावे व दर महिन्याला बैठका घ्याव्यात. धरणगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच जळगाव व धरणगाव तालुक्यांतील उर्वरित नाला खोलीकरणाची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून पाणीटंचाई दूर करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ उपक्रमाचे कौतुक करत उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर केल्या जातील, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून मजबूत संघटनात्मक फळी उभी करण्याचे आवाहन केले, तसेच लवकरच पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील, अशी माहिती दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील व उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी यांनीही पक्षसंघटना बळकट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये उपशहरप्रमुखपदी कमलेश भगवान बोरसे, सुरेश भास्कर महाजन, संतोष वाल्मीक महाजन व अहेमद नबुवतखां पठाण, शहर संघटकपदी प्रभुदास रोहिदास जाधव, उपशहर संघटकपदी गोविंदा सुनील मनोरे व किशोर साहेबराव पाटील, शहर कार्याध्यक्षपदी रवींद्र रमेश महाजन, शहर उपकार्याध्यक्षपदी सुदर्शन सुरेश भागवत, शहर समन्वयकपदी नाना लोटन मराठे, उपशहर समन्वयकपदी हेमराज चौधरी तर युवासेना शहरप्रमुखपदी कन्हैया महाजन यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक शहरप्रमुख वीरेंद्र (धीरेंद्र) पुरभे यांनी केले, सूत्रसंचालन विभागप्रमुख रवी महाजन यांनी केले, तर आभार माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी मानले. या सोहळ्यास युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जळगाव महानगरप्रमुख गणेश सोनवणे, उपनगराध्यक्ष विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदासअप्पा विसावे, विलास महाजन, पवन महाजन, बाळू जाधव, वासुदेव चौधरी, मोतीअप्पा पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







