पुणे (पंढरीनाथ गायकवाड) – कौटुंबिक वादातून दुसर्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना हडपसर येथे घडली. याप्रकरणी खून करणार्या पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुरेंद्र प्रकाश साळुंखे (वय ४२,रा. मीठगंज पोलीस चौकीजवळ, महात्मा फुले पेठ) याला अटक करण्यात आली आहे. अर्पणा अरुण महाडिक (वय ३६,रा. सहारा कॉर्नर, भेकराईनगर, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत महिलेच्या भावाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. साळुंखेचा टुरिस्ट व्यवसाय आहे. अर्पणा महाडिक आणि सुरेंद्र साळुंखे यांच्यात प्रेमसंबंध होते. महाविद्याालयात असल्यापासून दोघेजण एकमेकांना ओळखत होते. दरम्यान, साळुंखेने पहिला विवाह केला. पहिल्या पत्नीपासून त्याला अपत्ये आहेत. विवाह केला असतानाही साळुंखेचे अर्पणा महाडिक बरोबर प्रेमसंबंध सुरूच होते. यातून त्याने अर्पणा बरोबर काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला. त्याने तिला भेकराईनगर भागात सदनिकाही घेऊन दिली. अर्पणा सदनिकेत एकटीच राहत होती. साळुंखे तिच्याकडे नियमित यायचा. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. बुधवारी रात्री साळुंखेने अर्पणाचा गळा दाबून खून केला.
त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. शेजारी राहणार्या नागरिकांना काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने याबाबतची माहिती नागरिकांनी हडपसर पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा महिलेचा खून केल्याची घटना समोर आली. खून केल्यानंतर पसार झालेल्या साळुंखेला काही तासातच अटक करण्यात आली.







