कोरोना चाचणी नंतरच आमदारांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी प्रवेश

  • अधिवेशनापूर्वी दोन दिवस होणार चाचणी
  • विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – येथील प्रवेशद्वाराजवळ सदस्यांसाठी 5 व 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत आरटी-पीसीआर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पटोले यांनी याचा आढावा घेतला.
या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीस विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सोमवार‍ (दि. 7 सप्टेंबर) पासून मुंबई येथे सुरु होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, असे मंगळवारी (दि. 25 ऑगस्ट) झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
विधिमंडळ सदस्यांच्या वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा 4 सप्टेंबर, 2020 नंतर केलेला आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाला सादर करता येईल. अथवा तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधानभवन, मुंबई येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर केला जाऊ शकतो.
पीठासीन अधिकारी यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या सोबतचे स्वीय सहायक यांना विधानभवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी वरील प्रमाणे चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे .मंत्रालयातील व विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील वरीलप्रमाणे चाचणी अहवाल सादर केल्याशिवाय विधानमंडळ इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here