पणजी(गोवा) (विशेष प्रतिनिधी भरत पवार) – काँग्रेस पक्षाचा विश्वासघात करून एका रात्रीत भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे बाबू कवळेकर व अन्य नऊ आमदार नियमानुसार अपात्र ठरत असून काँग्रेसने सभापतीकडे दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर निवाडा होईपर्यंत, पक्षांतर केलेल्या या दहा आमदारांना सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवावे, अशी मागणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाकडे केली असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका तीन महिन्यांत निकालात काढाव्यात, असा निवाडा मणिपूरच्या उच्च न्यायालयाने दिलेला आहे. काँग्रेस पक्षाने त्याच निवाड्याचा आधार घेऊन भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या 10 बंडखोर आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांपैकी तीन जण आता भाजप मंत्रिमंडळात मंत्री असून सभापती राजेश पाटणेकर यांच्या आशिर्वादामुळे सरकारी सुविधांचा लाभ घेत आहेत. न्यायालयाने त्या मंत्र्यांसह दहाही जणांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाकडे केली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
पक्षांतर केलेल्या आमदारांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका सभापतीनी लवकरात निकालात काढून न्याय द्यावा, अशी काँग्रेसची मागणी होती. मात्र, अपात्रता याचिका दाखल करून 9 महिने उलटले, तरी सभापती ही याचिका निकालात काढीत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली,असे चोडणकर यांनी सांगितले.






