काठमांडू -भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढला असतानाच आता नेपाळने राजकीय नकाशातील बदला संदर्भातील संविधान संशोधन विधेयक संसदेत मंजूर केले आहे. या नव्या नकाशामध्ये भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांना नेपाळने आपल्या हद्दीत दाखवले आहे.
नेपाळच्या संसदेतील ५९ पैकी ५७ सदस्यांनी नकाशा बदला संदर्भातील संविधान दुरुस्ती विधयेकाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती संसद सभागृहाचे अध्यक्ष गणेश प्रसाद तिमिलसीना यांनी दिली.
गलवान खोऱ्यातील संघर्षावरून भारत आणि चीन दरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. आता नेपाळनेही नखे काढली आहेत. नेपाळच्या कायदेमंत्री शिवमाया तुंबाहंफे यांनी या नव्या नकाशासंबंधातील बदलासंदर्भात विधेयक संसदेत सादर केले होते. त्याला आज मंजुरी देण्यात आली. नेपाळ सरकारच्या भूसंसाधन मंत्रालयाने भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा भागाचा समावेश असलेला नकाशा प्रसिध्द केला होता. नेपाळच्या कॅबिनेट सदस्यांनी या नकाशाला पाठिंबा दिला होता. मात्र भारताने यावर तात्काळ आक्षेप घेतला होता.






