अहमदनगर (भरत पवार) – गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करून सुमारे २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असताना रविंद्र पांडुरंग लगड (रा.कसबा पेठ, सावता मंदिराशेजारी, पाथर्डी) इलेक्ट्रीक मशीनच्या सहाय्याने मावा तयार करुन विकत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पो.ना.रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, पो.काँ. राहुल सोळंके यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात तंबाखूजन्य पदार्थ व मावा तयार करण्याचे इलेक्ट्रीक मशीन, तयार सुगंधी तंबाखू, सुपारी, तयार मावा असा २ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पो.कॉ.राहुल सोळुंके यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.






