एरंडोल – सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व वाळूचे ठेके बंद आहेत. मात्र तालुक्यातील उत्राण, हनुमंतखेडे, वैजनाथ, टाकरखेडे, कढोली परिसरात असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातून दररोज सुमारे ७० ते ७५ ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून वाळूमाफिका बिनधास्तपणे वाळू तस्करी करीत असून, जास्त दराने विक्रीदेखील करीत आहेत. वाळूच्या या चोरट्या वाहतूकीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
ग्रामीण भागात कार्यरत असलेले तलाठी व मंडल अधिकारीही या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत. वाळू माफियांच्या दलालांचा सर्रासपणे तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय परिसरात वावर असतो. सद्यस्थितीत देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून, अनेक व्यवसाय बंद आहेत. मात्र लॉकडाऊन काळात वाळू माफियांना रान मोकळे झाले असून, वाळूची वाहने भरधाव वेगाने नेत असल्याने, त्यातून एखादी दुर्घटना घडल्यास जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. वाळू वाहतुकीबाबत सर्वच वर्तमानपत्रातून बातम्यादेखील वारंवार प्रसिध्द होत असतांना, वाळू माफियांवर महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. वाळू माफियांबाबत नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांना धमकी दिली जाते.
सद्यपरिस्थितीत दररोज सायंकाळी सात वाजेपासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाळू वाहतूक बिनधास्तपणे केली जात असताना महसूल प्रशासन गप्प का? अशी परिसरातील नागरिकात चर्चा आहे. याबाबत त्वरित दखल घेऊन तालुक्यातून होणारी वाळूची चोरटी वाहतूक त्वरित बंद करावी, तसेच या वाळूमाफियांवर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा एरंडोल काँग्रेस पार्टीतर्फे २२ जून पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी ११ ते ५ उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रसिध्दीपत्रकावर एरंडोल काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, एरंडोल शहर काँग्रेस अध्यक्ष संजय भदाणे, एरंडोल युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सैय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






