मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – महाराष्ट्रातील सुपरिचित सहज जलबोधकार आणि केंद्रीय भूजल विभागात
कार्यरत असलेले भूजल वैज्ञानिक उपेंद्र दादा धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील चांदोरीवाडी येथे ‘सहज जलबोध अभियान’ राबविण्यात येत आहे. परिपूर्ण जलव्यवस्थापनाकरिता पाणलोटाची जलधारण क्षमता समजणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सातत्याने पडत असलेला दुष्काळ, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई, सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान व त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल व भूपृष्ठजल साठे वाढविणे व पाण्याचा काटकसरीने वापर करुन शेती पध्दतीत बदल करणे हाच यावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी आदर्श भूजल आराखडा ही संकल्पना उपेंद्र दादानी सुचवली आहे. याच संदर्भात आराखडा निर्माणासाठीचे टप्पे व त्यातील तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक निसर्गरक्षक दयानंद मठपती व ग्रामसेवक आशिष देशमुख यांच्या पुढाकारातून चांदोरीवाडी येथे सहज जलबोधकार धोंडे यांच्या ‘आदर्श भूजल आराखडा – संकल्पना व टप्पे या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपेंद्र यांनी पाणलोट विज्ञान समजून घेण्यासाठी भूजल वैज्ञानिक, कृषी अधिकारी व सिंचन अभियंता यांच्या समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले. आराखडा निर्माणात गावशिवार फेरी, बैठक – सभा आणि प्रशासकीय संबंधातून माहिती संकलनाची पद्धती विषद केली गेली. चांदोरीवाडीकरांनी येत्या महिनाभरात जल आराखडा तयार करून लगेचच पाणलोटक्षेत्रात विविध जल संरचना हाती घेण्याचे ठरवले आहे. 
हा शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला आराखडा मराठवाड्यात पहिलाच भूजल आराखडा आहे. यामुळे या अभियानास विशेष महत्त्व आहे. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असे पाणलोट उपचार व निसर्ग संवर्धनासाठी काम केले जाणार आहे. उत्कृष्ट पूर्व नियोजन, तांत्रिक मार्गदर्शनातून परिपूर्ण पाणलोट उपचार, आवश्यक तेथे प्रशासनाचे सहकार्य, गावाच्या एकजूटीतून श्रमदान, सी. एस. आर. आणि शासकिय निधीचा सार्थक वापर, पाणी व्यवस्थापनाचा आदर्श निसर्ग बेट, देवराई, गाव तलाव व अनेक पुनर्भरण संरचनातून पुढील तीन वर्षात निसर्ग पुनर्स्थापनेचे काम करण्यात येणार आहे. चांदोरीवाडीकर आपल्या एकजूटीतून सतत तीन वर्ष या कामात सातत्य ठेवून हे सहज जलबोध अभियान
राबविणार आहेत. या अभियानाला वेळोवेळी धोंडे हे स्वतः चांदोरीवाडी येथे येऊन तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. चांदोरीवाडीतील हा उपक्रम लातूर जिल्ह्यासाठीच नाही तर, महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल. चांदोरीवाडी येथील प्रमोद पाटील, भरत व्यंजने, किशन व्यंजने, अमोल मेकाले, राजेंद्र व्यंजने, शुभम साबदे, नामदेव परगे, अशोक व्यंजने, नागेश खोकले, ज्ञानेश्वर पदातूरे, बाबूभाई व्यंजने, वैजनाथ राजूरे व यल्लालिंग पाटील यांनी ‘भूजल आराखडा प्रशिक्षण’ घेतले असून नियोजनाप्रमाणे कामाला सुरुवात देखील केली आहे. चांदोरीवाडीतील तरुण व गावकरी जल स्वयंपूर्ण गाव करतीलच असा विश्वास चांदोरी, बोरसूरी, वाकसा, उस्तुरी, चिंचोली (स.) टाकळी येथील नागरीकांनी बोलून दाखविला. चांदोरीवाडी येथे सुरु झालेल्या सहज जलबोध अभियानास निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, अरविंदभैय्या पाटील, उप विभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गणेश जाधव, सभापती राधाताई बिराजदार, उप सभापती अंजलीताई पाटील, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका कृषि अधिकारी संजय नाबदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.







