काँग्रेसचे ‘संकटमोचक’ गेले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

  • पहिले बंगाली राष्ट्रपती
  • पुढची पिढीही राजकारणात
  • 2019 मध्ये भारतरत्न

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना १० ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट या दिवशी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी दिल्लीतील लष्करी छावणीत असलेल्या लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे डॉक्टरांना आढळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
राजकीय क्षेत्रात प्रणवदा या नावाने परिचित असलेले प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ ला बंगाल्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच ते बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
प्रणवदांनी आपल्या करिअरची सुरुवात पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ ऑफिसमधून केली. ते क्लार्क होते. त्यानंतर ते सन १९६३ मध्ये विद्यानदर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक बनले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले . त्यानंतर सन १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.
थोड्याच काळात ते इंदिरा गांधी यांचे चाहते बनले. १९७३ मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या कार्यकालात औद्योगिक विकास मंत्रालयाचे उपमंत्री बनले. राजीव गांधी यांच्याशी मात्र त्यांचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
राजीव गांधी यांच्याशी त्यांचे न पटल्याने त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र पुढे ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. इंदिरा गांधी यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनावे हे प्रणवदांचे स्वप्न होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांनी प्रणवदांना मोठे सहकार्य केले. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी प्रणवदांकडे योजना आयोगाचे अध्यक्षपद सोपवले. त्यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात प्रणव मुखर्जी यांचे मोठे योगदान मानले जाते. राजकारणातील सर्व डावपेच त्यांनीच सोनिया गांधीना सांगितल्याचे म्हटले जाते. प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत असेही म्हटले जाते. सन २००४ मध्ये प्रणवदा जंगीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकले. त्याचवेळी केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार स्थापन झाले. मात्र यावेळी त्यांच्या ऐवजी डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आले. डॉ. सिंह यांच्यानंतर त्यावेळी प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे दुसरे मोठे नेते होते. डॉ. सिंह यांच्या ऐवजी ते पंतप्रधान बनले असते तर विकासात देश आणखी पुढे असता असेही बोलले जाते. जुलै २०१२ मध्ये पी. ए. संगमा यांचा पराभव करत ७० टक्के इतक्या भरघोस मतांनी ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. हे देशाचे १३ वे राष्ट्रपती होते. ते डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
पहिले बंगाली राष्ट्रपती
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्याप्रणव मुखर्जी यांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, अर्थ अशा वेगवेगळ्या खात्यांची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 2004मध्ये सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात प्रणव मुखर्जी यांनी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. सरकारचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जात होता. काँग्रेसने 2012मध्ये त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार घोषित केले. प्रतिस्पर्धी उमेदवार पी. ए. संगमा यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर, 25 जुलै 2012 रोजी मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे मुखर्जी हे पहिले बंगाली व्यक्ती होते.
पुढची पिढीही राजकारणात
प्रणव मुखर्जी यांची पुढची पिढीही सक्रीय राजकारणात आहे. त्यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी बंगालमधील जांगीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभेपूर्वी त्यांनी बंगालच्या विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते. मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यादेखील काँग्रेसच्या सक्रीय सदस्य आहेत.
2019 मध्ये भारतरत्न
भारताचे राष्ट्रपतीपद (२०१२-१७) भूषवलेल्या मुखर्जी यांना २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च भारतरत्न या सन्मानाने गौरव करून, त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. मुखर्जी यांच्या राजकीय जीवनाला खऱया अर्थाने सुरवात झाली ती, १९६९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांनी राज्यसभेवर निवडून आणल्यानंतरच. काँग्रेस पक्षात आणि विविध सरकारात मुखर्जी यांनी अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा ठसा उमटवला, काँग्रेसच्या कोअर टिममध्ये अनेक दशके ते टिकून राहिले, त्यामागे त्यांची उपयुक्तता, व्यूहरचना, अभ्यासूपणा, सर्वांशी असलेले सौहार्दाचे निकटचे संबंध कारणीभूत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here