जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी डॉक्टरांना दिसतात सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू

एक लाख चौतीस हजारांची मिळवून दिली सवलत;
रुग्ण सुधागड-पालीचा, हॉस्पिटल कळंबोलीचे

पनवेल/अलिबाग-सोगावकर – पनवेल महापालिका आणि लेखा परीक्षण समितीसह राज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रुग्णांची लूटमार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलला आणि त्यांच्या डॉक्टरांना कांतीलाल कडू नावाचे सामाजिक वादळ झोडून काढत आहे. रुग्णांचे बिल तयार करताना, तत्पूर्वी उपचार करताना अगदी दाखल करून घेतानाही कडू यांच्या नावाची कळ हृदयात येत आहे. आज आणखी एका कोविड रुग्णाचे तब्बल एक लाख चौतीस हजार रूपये वाचवण्यात त्यांना यश आले आहे.
सुधागड-पाली येथील एका कोविड रुग्णाला चार दिवसांपूर्वी कळंबोली-रोडपाली वेशीवरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. चार दिवसात 1 लाख 68 हजारांची औषधे आणि 3 लाख 16 हजार रूपये बिल असे पावणे पाच लाखापर्यंत बिल गेले होते. त्यात दुर्दैवाने रात्री रुग्ण दगावला. परंतु, हॉस्पिटलचे पूर्ण बिल वसूल होईपर्यंत मृतदेह देण्यात येणार नाही असे हॉस्पिटल प्रशासनाने बजावले. त्यात ऐंशी हजार कमी करण्याचे त्यांनी कबूल केले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तगादा लावला.
कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल सैद यांनी कांतीलाल कडू यांना ही हकिगत सांगितल्यानंतर तेथील डॉक्टरांची धडधड आपोआप वाढली. कडू यांनी अतिशय गोडपणे डॉक्टरांना डोस दिल्यानंतर सैद यांच्याशी संपर्क साधून संबंधीत डॉक्टरांनी एक लाख चौतीस हजार रुपयांची घसघशीत सूट दिली.
या आणि अशा अनेक प्रकरणात कांतीलाल कडू यांनी आतापर्यंत काही रुग्णांना तीस लाखाहून अधिक रक्कमेची सूट मिळवून दिल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक निश्चितपणे समाधानी आहेत. तर ज्या डॉक्टरांवर हे सामाजिक वादळ आदळते त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, जागृत आणि झोपेतही कांतीलाल कडू दिसत असल्याची चर्चा पनवेल, नवी मुंबईतील वैद्यकीय क्षेत्रात घोंगावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here