शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – तालुक्यातील गणोर या गावी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत
अस्मिता जागर मोहीम राबविण्यात आली. जागर मोहिमेअंतर्गत महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी अस्मिता जागर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून त्यांचा संघ निर्मिती करणे व त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करीत असते. तालुक्यातील जवळपास 181 गावांमध्ये ग्रामीण विकास योजनेअंतर्गत महिलांचे गट निर्माण करून त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणोर येथील जागृती महिला संघ यांनी या अभियानात सहभाग नोंदवित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेत आशा विनोद पटले प्रथम क्रमांक ,चंद्रकांता हिरामण पवार द्वितीय क्रमांक तर अनिता गुमानसिंग भावरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रम प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक श्री ईश्वर जगदाळे यांनी महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.अस्मिता प्लस या सॅनिटरी नॅपकिन चे महत्त्व विशद करून वापराचे फायदे त्यांनी स्पष्ट केले. सॅनिटरी नॅपकिन हे महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून अतिशय स्वस्त दरात या अभियानामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी या विभागातर्फे परसबागेत भाजीपाल्याची लागवड करणे , तसेच गृहपयोगी वस्तूंचे निर्मिती करणे व त्याची विक्री करणे याविषयी मार्गदर्शन व अर्थसाहाय्य केले जाते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान गणोर गावचे सरपंच दिलीप निकुंभ यांनी भूषवले. ग्रामसंघ अध्यक्षा विणा शेल्टे, सचिव अनिता भामरे, वासंती निकुंभ , अंगणवाडी सेविका अनिता वळवी, योगिता भांमरे व गावातील इतर महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.एम .एफ .वाय अशोक साळवे, प्रभाग समन्वयक विद्या वसावे, प्रकाश चव्हाण, कविता भामरे, गुणवंता भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी जास्तीत जास्त महिलांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी गावातून अस्मिता जागर रॅली काढण्यात आली.








