ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने कृतज्ञतेपोटी मानले आभार
अलिबाग-सोगावकर – न्यू फेरी वार्फ (भाऊचा धक्का)ते रेवस(अलिबाग),न्यू वार्फ ते मोरा(उरण), गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, गेटवे ऑफ इंडिया ते घारापुरी लेणी या जलमार्गे वर्षाला 40-50 लाख पर्यटक प्रवाशांची वाहतूक होते. या लाखो पर्यटक प्रवाशांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनला भरीव सहकार्य केले.
ज्यांनी मुंबई गोवा क्रुझ वाहतुकीसाठी अद्ययावत जेट्टी प्रकल्प बॅलार्ड इस्टेट येथे परदेशी क्रूझसाठी अत्यावश्यक असलेले व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवासी टर्मिनल आणि सध्या न्यू फेरी वार्फ मांडवा मार्गावर धुमधडाक्यात सुरू असलेली रो पॅक्स बोट (रो-रो)वाहतूक सेवा आदी महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया हे आपली एमबीपीटी तील साडेचार वर्षांची सेवा संपवून निवृत्त झाले आहेत. याबद्दल ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.या प्रकल्पामुळे समाजातील सर्व थरांतील प्रवाशांची सोय होणार आहे.खास करून न्यू वार्फ फेरी मांडवा मार्गावरील अद्ययावत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या रो- पॅक्स बोट (रो-रो) वाहतुकीमुळे अलिबाग तालुका मुंबईशी थेट जोडला जाणार असून अलिबाग,मुरुड बरोबरच जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला हातभार लागणार आहे.
या कृतज्ञतेपोटी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने लाखों प्रवासी वर्गातर्फे त्यांचे आभार मानून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणारे पत्रक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.







