सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 100 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी सकाळी धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा झाला. यावेळी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.
कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पूर्णत: कमी करण्यात आला आहे. आजअखेर कोयना धरणातून सहा वक्र दरवाजातून पूरपरिस्थितीत 19.65 टीएमसी तर पायथा वीजगृहातून 1.86 टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग केला आहे.
यावेळी कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे स.पो.नी. महेश बावीकट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणार्या कोयना धरणात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 101.57 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पूर्ण करणार्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने यंदा 31 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला. 100 टी.एम.सी.ने धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते.
ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन करण्यात आले. दरम्यान एक जुनपासून आजअखेर कोयना धरणाच्या टप्पा क्रं.1 व 2 मधून 272.5 मेगॉवॅट, टप्पा क्रं.3 मधून 144.5 मेगॉवॅट, टप्पा क्रं. 4 मधून 165.8 मेगॉवॅट, व पायथा वीज गृहातून 37.9 मेगॉवॅट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
ना. देसाई म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक, आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो.
सातारा जिल्हयाला वरदान असणारे हे कोयना धरण स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने व प्रेरणेने पूर्ण झाले. सुमारे 2000 मेगावॅट विजेची निर्मिती याच जलाशयातल्या पाण्यावरती करण्यात येते. आज जलपूजनच्या निमित्ताने मी कोयनामाईची आराधना केली आहे. कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे, त्याची अशीच भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली आहे. कोयना धारणाच्या पाण्यामुळे महाराष्ट्र समृध्द झाला आहे.







