दिल्लीतील सोने तस्करीचे सांगली कनेक्शन

आटपाडी तालुक्यात छापे

सांगली (प्रतिनिधी स्वप्निल कारेकर) – नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ते आठही जण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सोमवारी रात्री सीमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्यात छापे टाकले. यावेळी संशयितांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरून 8 जणांकडून 43 कोटी रुपयांची 83.6 किलो वजनाची 504 सोन्याची बिस्किटे डीआरआयने जप्त केली होती. आठही संशयित सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सोमवारी आटपाडी तालुक्यात छापे टाकण्यात आले. संशयित म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून या सोन्याची तस्करी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
संशयित नेहमीच या मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत असा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. आटपाडी तालुक्यात संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात महत्वाची माहिती पथकाच्या हाती लागली आहे. शिवाय त्या 8 संशयितांच्या मागे असणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. यातून सोने तस्करी करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here