मिरजेतील गणेश विसर्जन साधेपणाने अवघ्या १० तासात संपले

सांगली (प्रतिनिधी स्वप्निल कारेकर) –  ऐतिहासिक आणि मुंबई-पुणे नंतर सर्वाधिक काळ चालणारी अशी ख्याती असलेले मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक कोणत्याही वाद्याच्या दणदणाट आणि स्वागत कमानी शिवाय साधेपणाने अवघ्या दहा तासात संपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव सर्व मंडळाकडून साधेपणाने साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशी दिवशी मिरजेत अडीचशे मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले.
मिरजेतील गणेशोत्सव हा उंच आणि मोठया मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या वर्षी महापुरामुळे आणि यावर्षी कोरोना संसर्गामुळे विसर्जन मार्गावरील स्वागत कमान रद्द करण्यात आल्या. तसेच गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करावा यासाठी उंच मूर्ती बसवण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. त्यामुळे मिरजेतील सर्व मंडळांकडून लहान गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मिरज शहरात कोरोचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे मिरजेतील सर्व मंडळांच्या श्री मूर्तींचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत विसर्जन करावे, असे पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी केलेल्या आवाहनाला गणेश मंडळांनी देखील प्रतिसाद दिला. सकाळी साडेसात वाजता गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
प्रत्येक वर्षी मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक हे दोन दिवस चालते. मंडळांमध्ये गणेश मूर्ती सर्वात शेवटी विसर्जन करण्यासाठी चढाओढ असते. त्यामुळे मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तीचे सर्वात शेवटी विसर्जन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनामुळे कोणत्याही मंडळांमध्ये चढाओढ नव्हती. सकाळी दहा वाजताच मिरज शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here