पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) – पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी पत्रक काढून माहिती दिली आहे.
वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाच्या दुस-याच दिवसानंतर मंदिर समितीने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात आज (दि. १) एक बैठक घेतली. त्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल होती. ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.







