लडाख – भारतीय लष्काराने लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने रचलेला कट उधळून लावला आहे. तसेच ब्लॅक टॉप डोंगरावरील पोस्टवर ताबाही मिळवला आहे.
२९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सेनेने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या घुसखोरीला भारतीय लष्काराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ब्लॅक टॉप डोंगरावरील पोस्टवर ताबा मिळविला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचे चिनी सैन्याचे कॅमरे आणि पाळत ठेवणा-या उपकरणांची यंत्रणा हटवली आहे. यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये सध्या तणाव आहे.
पांगोंग तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस ब्लॅक टॉप पोस्ट आहे. त्याठिकाणी चिनीच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने कॅमेरा आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसविली होती. भारतीय लष्काराच्या ही बाब लक्षात येताच भारतीय लष्काराच्या जवानांनी जाऊन या पोस्टवर ताबा मिळवून तेथील चीनने लावलेले कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची उपकरणे उखडून टाकली. चीनने आपली सीमा देखरेख यंत्रणा स्वयंचलित केली असून भारतीय सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सॉर तैनात केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने ब्लॅक टॉप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा होत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.







