सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जावली तालुक्यातील मार्ली घाटात खून करून मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीच्या प्रकरणाला खळबळजनक वळण लागले होते. या दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचाही खून झाल्याचे सोमवारी उघड झाले.
दाम्पत्यानंतर एका मुलाचाही काल सोमवार (दि. ३१) रोजी घाटात मृतदेह सापडला असून दुसर्या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी पुन्हा मृतदेहाचा तपास सुरू झाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सनी दुसऱ्या मुलाचा शोध घेत त्याच्या हाडाचा सापळा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या घाटात विशाल जाधव (वय २६) व तुषार जाधव (वय २०) असे हे दोन्ही सख्ख्या भावाचे मृतदेहाच्या हाडाचे सांगाडे काल आणि आज महाबळेश्वर ट्रेकर्सना शोधण्यात यश आले.
संशयित आरोपी योगेश निकम यांच्यावर मेढा पोलिस स्थानकामध्ये चार जणांच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला मेढा न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्याची व्याप्ती व त्यातील गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते घटनेकडे बारीक लक्ष देऊन आहेत. मंगळवारी (दि. १) सकाळी त्यांनी घटनास्थळी भेट दिली व घडलेल्या घटनेची सखोल माहिती घेतली. यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना एसपी तेजस्वी सातपुते म्हणाल्या, मेढा घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहांची माहिती घेतली जात असून वैद्यिक शाळेत ते तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत. संशयित आरोपीने या संदर्भात केलेला गुन्हाविचारात घेता पोलिस तपासात अन्य काही बाबी समोर येतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.







