दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, 35 हजार लिटर दूध पाण्यात

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नवापूर येथील रंगावली नदीच्या पुलावर दुधाचा टँकर व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दुधाचा टँकर नदीत पडतांना वाचला. मात्र, त्याची टाकी फुटल्याने त्यातील दूध नदीपात्रात वाहून गेले. टँकरमध्ये सुमारे 35 हजार लिटर दूध होते. यात टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
येथील रंगावली नदीच्या पुलावरुन आज (जीजे-18-झेड 2233) हे दुधाचे टँकर मालेगावहून गुजराथ राज्यातील गोधरा येथे जात असतांना व मालवाहू ट्रक (क्र.जी.जे.10-टीव्ही 9968) हा सुरतकडून बँगलोरकडे जात असतांना दोघा वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुधाचा टँकर पलटी झाला व पुलावरून नदीत पडता पडता वाचला. त्यामुळे जिवीतहानी टळली. मात्र, दुधाची टाकी फुटल्याने दूध थेट नदीत वाहून गेले. सदर टँकरमध्ये 35 हजार लिटर दूध होते. यात चालकाचा पाय अडकल्याने त्याला दुखापत झाली आहे.
स्थानिक नागरिक व नवापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे सहायक उपनिरीक्षक कृष्णा पवार, योगेश तनपुरे, पंकज सुर्यवंशी यांना चालकाला बाहेर काढण्यात यश आले. राष्ट्रीय महामार्ग सहावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.याबाबत नवापूर तालुक्याचे आ.शिरीषकुमार नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे तत्कार केली आहे.
गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सदर मालवाहू ट्रकचालक रहिमभाई हुसेनभाई साध (वय 32, रा.केसोद जि.जुनागड) याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दुध टॅकरचा चालक विरेंद्र जसवंत यादव (रा.पंचमहल गोध्रा गुजराथ) याला पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here