जळगाव (संपादक सुनिल पाटील) – बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळतील असेही त्यावेळी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचे नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने दिसून आले आहे. पुण्यातील टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर (42) यांचे वेळेत उपचार न झाल्याने निधन झाले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्ट रोजी थंडी आणि तापाचा त्रास होवू लागला. त्यांनी डॉक्टरांकडे जावून उपचार घेतले. 27 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत अहवाल निगेटीव्ह आला. 28 ऑगस्ट रोजी रायकर अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव येथे गेले. मात्र त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी कोपरगाव येथे अँटिजेन टेस्ट केली असता त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला.
30 जुलै रोजी पुणे येथील जम्बो हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. मंगळवारी त्यांची ऑक्सिजनची लेव्हल अगदीच कमी झाली. त्यामुळे जम्बो हॉस्पीटलमधून दुस-या हॉस्पीटलमधे नेण्यासाठी तेथे रुग्णवाहिका नव्हती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी रात्री प्रयत्न सुरुच होते. एक रुग्णवाहीका मिळाली मात्र त्यात व्हेंटीलेटर नादुरुस्त होता असे सांगण्यात येत आहे. अजुन दुसरी रुग्णवाहिका मिळाली मात्र त्यात डॉक्टर हजर नव्हते. या सर्व घटनाक्रमात रात्रीचे सव्वा बारा वाजून गेले. पहाटे चार वाजेच्या सुमारास पुन्हा रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच होते. अखेर मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एक रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे समजले. या कालावधीत सकाळी पाच वाजता पत्रकार रायकर यांचे निधन झाले.
इथे सर्व भयंकर आहे, मला इथून घेऊन जा…..; पांडुरंग रायकर यांचे सहकाऱ्यांशी झाले अखेरचे बोलणे
एक पत्रकार जातो याहून भयंकर आहे एक माणूस प्रशासकीय गलथानामुळे जातो. पुण्यात मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या जंम्बो हॉस्पीटलमध्ये त्यांना ॲडमीट करण्यात आलं. काल रात्री दिड वाजता आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी What’s app करून सांगीतलं…. इथे सर्व भयंकर आहे, मला इथून घेऊन जा….. !!!
काल रात्री तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रभर फोन करुन देखील कार्डियॅक ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. एक ॲम्ब्युलन्स आली त्यातील व्हेंटिलेटर बिघडलेला होता. दूसरी ॲम्ब्युलन्स आली त्यामध्ये डॉक्टर नव्हते. रात्रभर प्रयत्न केल्यानंतर पहाटे दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून ॲम्ब्युलन्स पाठवण्यात आली तेव्हा पांडुरंग रायकर आपल्याला सोडून गेले होते.
पुण्यासारख्या शहरात एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचा मृत्यू वेळेत ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने, वेळेत बेड न मिळाल्याने होत असेल तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती भयानक असेल याचा विचार करायला हवा.. पांडुरंग_रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.







