- उच्चांकी 713 बाधित, बुधवारी 373 मुक्त
- कराड, साताऱयात रुग्णवाढ सुरुच, कोरोना बळींची संख्या 430
- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाकडून पारदर्शकतेची गरज
- 2 हजार 90 होम आयसोलेट, कराडात 50 रुग्णांचे वाचले प्राण
सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – एकीकडे अनलॉक 3.0 सुरु असताना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जिल्हय़ात 10 दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र लॉकडाऊनच्या काळातच बाधितांची संख्या वाढू लागली व लॉकडाऊनंतर तर जिल्हय़ातील बाधितांच्या संख्येने चीनमधील वुहान शहराला देखील मागे टाकले आहे. आजमितीस एकूण बाधितांची संख्या 15 हजार 247 असून त्यापैकी 7 हजार 778 जणांनी कोरोनाला हरवले आहे. तर सध्या उपचारार्थ 7 हजार 39 अक्टिव्ह रुग्ण जिल्हय़ात आहेत. दरदिवशी 500 च्या पटीत येणारी बाधितांची संख्या नागरिकांना भयग्रस्त करु लागली असतानाच अनलॉक 4.0 मध्ये अनेक बाबी सुरु झाल्याने नेमके काय ? असा सवाल मनात घेवून जिल्हावासियांची जगरहाटी सुरु आहे. यामध्ये कराडच्या ऑक्सिजन चळवळीने दिलासा दिला असून 50 रुग्णांचे प्राण वाचले आहेत तर मंगळवारी कोरोना मुक्तीने आठ हजाराचा टप्पा ओलांडत या लढाईतील दिलासा आणखी वाढवला आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 589 जणांचा अहवाल बाधित आहे. बुधवारी सकाळी अहवालात जिल्हय़ातील 16 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात देखील 713 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे. मात्र दिवसभरात 373 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर केलेली मात या संकटात दिलासा देणारी ठरली आहे. एकूण कोरोनामुक्ताची संख्या आठ हजार 151 झाली आहे.
जिल्ह्यातील 373 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 30, कराड तालुक्यातील 82, खंडाळा 27, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव 12, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 17, पाटण तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 4, सातारा तालुक्यातील 148 व वाई तालुक्यातील 31 असे एकूण 373 नागरिकांचा समावेश आहे.
कराडच्या ऑक्सिजन चळवळीने लढाईला बळ
कोरोना बाधितांच्या संख्येच्या तुलनेत त्यांच्यावर उपचार करणाऱया हॉस्पिटल, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांची संख्या कमी पडत आहे. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना घरीच ठेवावे लागत आहे. रुग्णालयातील बेड रिकामा होईपर्यंत घरातच थांबून मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणाऱया रुग्णांना प्राणवायू देण्यासाठी पालिकेसह कराडकर नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पालिकेसह शहरातील विविध संस्था, ग्रुप, लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी आतापर्यंत जवळपास 16 पोर्टेबल ऑक्सिजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱयांसह शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते थेट बाधिताच्या घरी जाऊन रुग्णाला ऑक्सिजन देत असल्याने कोरोना विरूद्धच्या लढाईला अधिकचे बळ मिळत आहे. अशाप्रकारे आतापर्यंत शहरातील जवळपास 50 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.
जिल्हय़ात 16 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बुध ता. खटाव 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड 60 वर्षीय पुरुष. विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई 62 वर्षीय महिला, शेंदूरजणे, ता. वाई 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई 60 वर्षीय महिला, गंगापुरी वाई 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
2 हजार 90 नागरिक होम आयसोलेट
सातारा जिल्हय़ात कडक लॉकडाऊन काळात घरात बसून कोरोनाविरुध्द लढा दिला. तेव्हा कोरोना बाधितांची संख्या नगण्य होती. मार्चपासून सुरु असलेला कोरोना विरुध्दची लढाई आता अंतिम टप्प्यात असताना सातारकरांच्या मनात भीती निर्माण करु लागलीय. 500 च्या पटीत दररोज बाधित आढळून येत असल्याने जनता पॅनिक होवू लागलीय. कोरोना टेस्टींग वाढवल्याने मोठया प्रमाणावर बाधित सापडत असल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील 70 टक्के नागरिकांना कोणतीची लक्षणे नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे जिल्हय़ात सध्या 2 हजार 90 नागरिक आपल्या घरातच होम आयसोलेट आहेत.
सर्व अनलॉक होताना कोरोनाही अनलॉक
केंद्र सरकारने अनलॉक 4.0 च्या गाईडलाईन जाहीर केल्यानंतर सातारा जिल्हय़ात देखील हॉटेल, लॉजिंगसह सार्वजनिक बस व्यवस्थेसह अनेक आस्थापना सुरु झाल्या आहेत. मास्क वापरा, हात धुवा, सॅनिटराईज वापरा, सुरक्षित अंतर राखून काळजी घेत हे सर्व सुरु करा अशा सूचना प्रशासन करत असताना बाधितांची संख्या वाढत असून कोरोना देखील अनलॉक होत आहे. कोरोना लॉक कधी होणार, त्यावरील लस कधी येणार याचीच चर्चा या भयावह वातावरणात जिल्हय़ात सुरु आहे.
942 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 169, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 96, वाई 32, खंडाळा 99, रायगांव 68, पानमळेवाडी 54, मायणी 104, महाबळेश्वर 42, पाटण 11, दहिवडी 28, खावली 50, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 139 असे एकूण 942 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
जिल्हय़ात बुधवारपर्यंत एकूण नमुने 46665, एकूण बाधित 15960, एकूण मुक्त 8151, मृत्यू 430, उपचारार्थ रुग्ण 7379
बुधवारी एकूण बाधित 713, एकूण मुक्त 373, एकूण बळी 16







