तिसऱ्या दिवशीही मेजर जनरल स्तरावरील चर्चा निष्फळ

बीजिंग – गलवान खोर्‍यातील तणाव कमी करून तेथील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरू असलेली मेजर जनरल स्तरावरील चर्चा गुरुवारी तिसर्‍या दिवशीही निष्फळ ठरली. चीनने आपली तिरकी चाल कायम ठेवल्याने चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. भारतीय भूभागात 8 ते 10 कि.मी. केलेली घुसखोरी मागे घेण्यास चीनने नकार दिला असून आता तर गलवान नदीवर धरण बांधून भारताचे पाणी अडविण्याचाही चीनचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाला सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे.
गलवान खोरे आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्यावरून भारताचा चीनबरोबर गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. चीनने एकीकडे चर्चेत सहभागी होतानाच, दुसरीकडे सीमेवरील आगळीक सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. भारताने चीनच्या सीमेवर आपल्या हद्दीत पक्के रस्ते बांधण्यास सुरुवात केल्यापासून चीनचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे त्यांनी वारंवार कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच परिणिती सोमवारच्या हिंसाचारात झाली होती. दरम्यान, चीनने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने सीमेवरील आमची कुमक आता अजिबात कमी न करता तितक्याच आक्रमकपणाने त्यांना उत्तर देण्याचा निर्धार भारताने केला असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर गेल्या मंगळवारी ताब्यात घेतलेल्या भारतीय लष्करातील १० जवानांची चीनने सुटका केली आहे. सुटका जवानांमध्ये ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी भारतीय जवानांची सुटका केल्याचे वृत्त आहे. सीमेवरील सैन्य कपातीच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मात्र, चर्चेत चीनकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. आज पुन्हा चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here