- सा.बा.विभागामार्फत रस्त्यांचा विकास होण्याचा मार्ग सुकर !
- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश
धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – जळगांव तालुक्यातील ३५ किमी लांबीच्या २ मोठ्या रस्त्यांची दर्जोन्नती होण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणुन घोषित केले आहे. या सर्व रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाला असून जामनेर तालुक्यातील ३० किमीच्या योजना बाह्य रस्त्यांचा रस्ते विकास योजना २००१-२१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे
या दरजोन्न रस्त्यांचा सा.बा. मार्फत होणार कायापालट
जळगाव तालुक्यातील सुजदे ते सुजदे फाटा , सुजदे फाटा ते आव्हाने रस्ता ( ग्रा.मा.४६, ८८ व व ५६ ) लांबी २०.५०० किमी तसेच जळगांव मेहरूण- पांजरपोळ- कुसुम्बा – चिंचोली- धानवड -करमाड रस्ता लांबी १४ किमी अशा ३५ किमी रस्त्यांना दरजोन्नती आज प्राप्त झाली आहे. जळगाव तालुक्यातील दुर्लक्षित असलेल्या ३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना दरजोन्नती मिळाल्यामुळे रस्त्यांचा सा. बा. मार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
सदर रस्त्यांवरील गावांची संख्या , लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या २ मोठ्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दरजोन्नती करण्यास मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दळण – वळणासाठी खूप जिकरीचे झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन सदर रस्त्यांचा दरजोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता जि.प.कडील ३५ किमीचे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होणार आहे.
दरम्यान, सदर रस्त्यांच्या दरजोन्नती साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे सुभाष राऊत, अधीक्षक अभियंता, पी. पी. सोनवणे जि प. चे कार्यकारी अभियंता येवले यांनी प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर केला होता.
जामनेर तालुक्यातील ३० किमीचे शेती रस्ते झाले ग्रामीण मार्ग
जामनेर तालुक्यातील ३० किमीचे योजनाबाह्य (शेती रस्ते ) रस्ते हे ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना २००१-२१ मध्ये समाविष्ट करणेबाबत मंजुरी मिळाली आहे. यात पळासखेडे विटनेर (हिवरखेडा ) रस्ता, वाकोद ते पळासखेडा (मोगलाईचे) रस्ता , ग्रा.मा. ९२ ते प्रजिमा १८ रस्ता , अंबिलहोळ देवीचे ते गारखेडा बुद्रुक रस्ता, सावरगाव ते ग्रा.मा.६७ ला जोडणारा रस्ता , हरीनगर ते कुंभारी बुद्रुक रस्ता , लोणी ते राहीरा रस्ता , मेंणगाव ते चिंचखेडा दिगर रस्ता, लोणी ते टाकळी पिंप्री रस्ता , कापूस वाडी ते तालुका हद्द (शिंदखेडा) रस्ता व गारखेडा खुर्द तालुका हद्द (मांडवे दिगर) रस्ता अशा एकूण ३०.०५ किमी लांबीच्या ९ शेती रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाला आहे.
परिणामी रस्ते विकास योजना २००१ – २०२१ मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत ३५ किमी ने वाढ होऊन एकूण लांबी ३५२९.७५ की मी इतकी झाली आहे. तसेच ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत ३०.०५० किमीने वाढ होऊन एकूण लांबी ६१७६.४५ किलोमीटर इतकीे झाली आहे.







