लंडन – नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ब्रिटनमधील प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळविली आहे. मलाला युसूफझाई ऑक्सफोर्डच्या लेडी मार्गारेट हॉल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करताना मलाला युसूफझाईने लिहिले आहे की, “मी ऑक्सफोर्डमधून मी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.” याशिवाय, फोटोत ती आपल्या कुटुंबीयांसोबत पदवी मिळाल्याचा आनंद सेलिब्रेटी करताना दिसत आहे. तिने आपल्या कुटुंबासमवेत केक कापला. केकमध्ये लिहिले आहे, ‘हॅपी ग्रॅज्युएशन मलाला.’ दुसर्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर भरपूर केक लावला आहे आणि ती हसत आहे.
मलाला युसूफझाई हिने मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत जगभरात ख्याती मिळविली आहे. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात मलाला युसूफझाई हिने मुलींना शिक्षण मिळण्यासाठी काम केले आहे. शिवाय, तालिबान्यांविरुद्ध बीबीसी उर्दू ब्लॉगवर लिहिले होते. त्यानंतर तिच्या डोक्यात तालिबान्यांनी गोळ्या घातल्या होत्या. 2014 मध्ये मलाला युसूफझाई हिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.






