जळगाव – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. संशियत आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये आवश्यक ते उपचार सुरु आहेत. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्ण लवकरात लवकर पुर्णपणे बरा होऊन त्याच्या कुटुंबियांमध्ये आपल्याला आनंद निर्माण करता यावा. यास सर्व कोविड सेंटरच्या डॉक्टरांचे प्राधान्य असणे आवश्यक आहे.
त्यासाठी कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टरांनी दररोज सायंकाळी नियमितपणे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून एकमेकांशी संवाद साधावा. तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे. याची माहिती घेऊन पुढील उपचारासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समिती व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणांसह सर्व संबंधितांना वरील सूचना केल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, महानपालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रार्दुभावासह मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅब तपासणी अहवाल 24 तासात प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करुन एकमेकांत समन्वय राखावा.






