पुन्हा एकदा जळगाव कोविड रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता

जळगाव – येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील “कोविड’ रुग्णालयातून 80 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह शौचालयात सापडला होता. आज पुन्हा 80 वर्षीय संशयित रुग्ण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा रुग्ण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील 82 वर्षीय वृद्ध कोविड संशयित होते. त्यांना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आले आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात वृद्ध रुग्ण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. नगरदेवळा येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्या ठिकाणीही तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वी याच रुग्णालयाच्या कोविड कक्षातून 80 वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. ती शौचालयात मृत अवस्थेत आढळून आली होती. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी चौकशी करून “डीन’सह तीन डॉक्‍टरांना तसेच काही कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचीही बदली करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here