पॅरिस – फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तिथे एकाच दिवसात तब्बल 7000 जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेषतः फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या हेरॉल्ट आणि केप दी’आगदे शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
युरोपातल्या निसर्ग पर्यटनासाठीचे सर्वात मोठे रिसॉर्ट्स इथे आहेत. विलासवादावर त्यांचा मुख्य भर असतो. सेक्स, चंगळ, मौज-मजा यासाठी हे रिसॉर्ट प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या या मोठमोठ्या रिसोर्टबाहेर आरोग्य प्रशासनाने मोबाईल टेस्टिंग ऑपरेशन युनिट्स उभारले आहेत. या मोबाईल टेस्टिंग युनिट्सद्वारे कोरोना चाचणी करण्यात आलेल्या 800 पर्यटकांपैकी तब्बल 30% जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इथल्याच मुख्य शहरापासून जरा दूर ‘village naturiste’ नावाचं एका मोठं रिसॉर्ट आहे. खरंतर एक गावच. या गावात डझनभर स्विंगर्स क्लब, सॉना आणि इरॉटिक नाईटक्लब्ज आहेत. जोडप्यांना त्यांचे खाजगी क्षण घालवण्यासाठीची ही गुप्त ठिकाणंच आहेत. बरेचदा हे सगळं खुलेआम सुरू असतं.अर्थातच सर्वच निसर्गप्रेमी स्विंगर्स नसतात. निवांत क्षण घालवण्यासाठी बरेचजण इथे येत असतात.
उन्हाळ्यात इथे दररोज जवळपास 45 हजार पर्यटक असतात. यातले बहुतांश पर्यटक आठवडाभरासाठी येतात. बेबीलोन, क्युपिड, एडेन अशा नावांनी जागा भाड्याने घेऊन राहतात. तर काही जण फक्त विकेंड्सना येतात. एक दिवस चैनीत घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, ही परिस्थिती कोव्हिडच्या आधीची आहे.
ऑगस्ट महिना संपत असताना ‘Village naturiste’मधले दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. इथल्या एका हॉटेलच्या गच्चीवर पार्टी आयोजित केल्याचं, हॉटेल मालकानेच मान्य केलं आहे. त्या पार्टीत कुणीही सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. “विषाणू संसर्गामुळे यातले बहुतांश पर्यटक यावर्षी फिरकलेच नाहीत. दुसरं म्हणजे आमच्याच रिसॉर्टमध्ये कोरोनाग्रस्त आढळले. मात्र, ते टाळता आलं नसतंच.”
केप डी-आगदेमध्ये जवळपासच्या परिसरापेक्षा चारपट जास्त केसेस असल्याचं फ्रान्सच्या आरोग्य प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, यापैकी कुणालाही हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्याची गरज भासली नसल्याचं इथल्या स्टाफचं म्हणणं आहे. इतर जगाप्रमाणेच केप डी-आगदेमध्ये प्रत्येक शहरात आणि गावात चेहऱ्यावर मास्क बांधणं बंधनकारक आहे. मात्र, स्विंगिंगसाठी ‘Village naturiste’मध्ये येणारे स्वाभाविकच मास्क वापरत नाहीत. स्विंगींगमध्ये मास्क वापरणार तरी कसा?
वयाच्या चाळीशीत असणारं यातलं एक जोडपं काही वर्षांपूर्वी फ्रान्समधल्याच बॉर्डोक्स शहरातल्या एका स्विंगर्स क्लबमध्ये एकमेकांना भेटले. त्यानंतर ते दोघंही एकत्रच या गावात आले. हे गाव एका रात्रीतून मॅजिक लोकेशनवरून ट्रॅजिक लोकशन बनलं. आम्ही सर्वच जोखीम पत्करत असलो तरीसुद्धा लॉकडाऊन खूप कठोर होता आणि दिर्घकाळही होता. त्यामुळे आमच्याच भल्यासाठी आम्हाला बाहेर पडणं भाग होतं.”
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं लक्षात येताच इथले अनेक क्लब आणि बार जिथे शारीरिक संपर्क अधिक यायचे तातडीने बंद करण्यात आले. विकी बीच रिसॉर्टही बंद करण्यात आलं. या रिसॉर्टचे संचालक करीम इसारतेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “मला माझ्या 22 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागलं. हा सिजन तर संपला. पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या पूल पार्टी ही आमची ओळख आहे. मात्र, अशा पार्टी आम्ही यापुढे करू शकणार नसल्याचं प्रशासनाने सांगितलं.”
ले ग्लॅमोर नाईटक्लबसुद्धा पर्यटकांमध्ये बरंच लोकप्रिय आहे. ‘नेक्ड फोम पार्टी’साठीचं हे खास ठिकाण. एका पार्टीत जवळपास हजार लोक एकत्र यायचे. मात्र, मार्चमध्येच या पार्ट्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्ट्या बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. इतका की आगदेमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावून सांगावं लागलं की सर्वांना जरा धीर धरा, ले ग्लॅमोर नाईटक्लब लवकरच सुरू होईल.
“आजमितीला इथे फक्त 5000 लोक आहेत. एरवी या सिझनमध्ये किमान 25 हजार पर्यटक असतात. पण यावर्षी मौज-मजा करण्याचा कुणाचाच मूड नाही.” फिलीप सांगत असले तरी मी ज्या स्विंगर्सना भेटलो त्यांनी सांगितलं की कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी स्विंगर्स अॅक्टिव्हिटी पूर्णपणे थांबलेली नाही. उलट या परिस्थितीत सगळेच अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बीचवर गेल्यावर याचा प्रत्ययही येतो. कमरेभोवती चेन घातलेल्या स्त्रिया तर संपूर्ण शरीर शेव्ह केलेले पुरूष बीचवर फिरताना दिसतात. यातले बरेचजण वयाची पन्नाशी, साठी उलटलेले आहेत. मात्र, तरीही आकर्षक दिसण्याची हौस तिळमात्र कमी झालेली नाही. काही तरुणही आहेत. संध्याकाळी बरेचजण कपडे घालून अर्थातच सेक्सी आउटफिटमध्ये बीचवरच्याच ओपन-एअर बारमध्ये दिसतात. सगळा मामला ‘एका कटाक्षा’साठी असतो आणि काही क्षणातच त्यातलेच अनेक जण जोडप्यांनी टेबलावर गप्पा मारताना दिसतात. काही आपल्या पार्टनरसोबत आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये परततात. तर काही बीचवरच्या वाळूमध्ये बसून एकांताचे क्षण घालवतात.
नॅचरिस्ट व्हिलेजच्या जवळचं प्राचिन गाव पूर्वीपेक्षा गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र, तरीही काही पर्यटक आहेत. सुट्टीसाठी डी-आगदेला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाने काही काळ तरी वाट बघण्याचं आवाहन केलं आहे. तर जे लोक घरी परतण्याच्या विचारात आहेत त्यांनी कोव्हिड टेस्ट करूनच परतावं, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत.







