मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप

एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला.
आणखी पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका-टिप्पणी करूच शकत नाहीत. कारण सर्व तत्त्व, सत्त्व विसरून फडणवीसांनी त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिले. चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहून तुम्ही पतीव्रता कसे राहू शकतात? तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी आपल्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला केला.
यावेळी ते म्हणाले की, पूर्वी पक्षात गोपीनाथ मुंडे आक्रमक शैलीत बोलायचे. दुसऱ्या बाजूला भाऊसाहेब फुंडकर यांची तोफ चालायची. तिकडे नागपूरला गेले तर नितीन गडकरी यांचा तोफखाना एकदम जोरात चालायचा. इकडे गिरीश बापट, विनोद तावडे, पंकजा मुंडे मी स्वतः तसेच हरिभाऊ बागडे असे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत असत. त्यावेळी सरकार गांगरून जायचे. एकदम हादरून जायचे. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व नेतेमंडळी गुपचूप बसली आहे. सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, पंकजा मुंडे काही बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे पदाधिकारी आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ते कधीतरी बोलतात. आताच्या घडीला सरकारविरोधात आक्रमक भाषा पाहिजे, त्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरच शंका उपस्थित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here