अरुणावती नदीवरील बंधाऱ्यात दोन युवक बुडाले

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वरुळ) – शहराजवळील आमोदे गावाजवळ अरुणावती नदीवरील बंधार्‍यात दोन युवक पोहतांना बुडाले. त्यापैकी एका युवकाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. तर दुसरा युवक बुडाला असून त्याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. ही घटना शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली.
शहराजवळील आमोदे गावाच्या शिवारातील अरुणावती नदीवरील बंधार्‍यात सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गरताड येथील अजय देविदास भिल (वय 17) आणि त्यांचा आतेभाऊ सोमनाथ भिल हे दोघे साठवण बंधार्‍यात पोहण्यासाठी उतरले. दोघा भावांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागले. हा प्रकार बंधार्‍याजवळच बकर्‍या चारणार्‍या गुलाब भिल याच्या लक्षात आल्याने त्याने क्षणाचाही विचार न करता बंधार्‍यात उडी घेत सोमनाथ भिल याला किनार्‍यावर आणून सोडले. पुन्हा दुसर्‍याला वाचविण्यासाठी नदी पात्रात उडी घेतली. पण अजय भिल मिळून आला नाही. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर पट्टीच्या पोहणार्‍यांकडून पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे परंतु पाण्याचा विसर्ग जोरात असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत युवकाचा शोध लागला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here